Lumina
Psalms

Forsake Me Not in Old Age

Psalms 71·Marathi Bible

1परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.

2तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील. तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.

3माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो, तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस. तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.

4देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव. मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.

5प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच तुझ्यावर विश्वास टाकला आहे.

Psalms 71 illustration - Psalms Chapter 71

6जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीचतुझी प्रार्थना केली.

7तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो.

8तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.

9केवळ मी आता म्हातारा झालो आहे म्हणून मला दूर लोटू नकोस, माझी शक्ती क्षीण होत असताना मला सोडून जाऊ नकोस.

10माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.

Psalms 71 illustration - Psalms Chapter 71

11माझे शत्रू म्हणाले, “जा त्याला पकडा देवाने त्याला सोडले आहे आणि कोणीही माणूस त्याला मदत करणार नाही.”

12देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.

13माझ्या शत्रूंचा पराभव कर. ते मला इजा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना त्याबद्दल लाज वाटावी अशी माझी इच्छा आहे.

14नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.

15तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन, तू जेव्हा जेव्हा मला वाचवलेस त्याबद्दलही मी सांगेन. ते प्रसंग मोजता न येण्याइतके अगणित होत.

Psalms 71 illustration - Psalms Chapter 71

16मी तुझ्या मोठेपणाबद्दल सांगेन, परमेश्वरा, माझ्या प्रभु मी केवळ तुझ्याबद्दल आणि तुझ्या चांगुलपणाबद्दल बोलेन.

17देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.

18आता मी म्हातारा झालो आहे आणि माझे केस पांढरे झाले आहेत. पण देवा, तू मला सोडून जाणार नाहीस हे मला माहीत आहे. मी प्रत्येक नव्या पिढीला तुझ्या सामर्थ्याबद्दल आणि महानतेबद्दल सांगेन.

19देवा, तुझा चांगुलपणा आकाशापेक्षाही उंच आहे. देवा, तुझ्यासारखा देव कुठेही नाही. तू अद्भुत गोष्टी केल्या आहेस.

20तू मला संकटे आणि वाईट काळ दाखविलास परंतु तू मला त्या प्रत्येकातून वाचविलेस आणि मला जिवंत ठेवलेस. मी कितीही खोल बुडालो तरी तू मला माझ्या संकटांतून वर खेचलेस.

Psalms 71 illustration - Psalms Chapter 71

21पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर. माझे सांत्वन करणे चालूच ठेव.

22आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन. माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन.

23तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.

24माझी जीभ नेहमी तुझ्या चांगुलपणाची गाणी गाईल आणि ज्या लोकांना मला ठार मारायची इच्छा होती त्यांचा पराभव होईल आणि ते कलंकित होतील.

Chapter Complete

You have read Psalms 71

24 verses