Lumina
Genesis

Genesis 18

Genesis 18·Marathi Bible

1काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता.

2अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले;

3अब्राहाम त्यांचे स्वागत करुन म्हणाला, “माझ्या स्वामीनों, मी जो आपला सेवक त्या माझ्या सोबत कृपा करुन काही वेळ राहा;

4तुमचे पाय धुण्यासाठी मी पाणी घेऊन येतो; तुम्ही झाडा खाली सावलीत अमळ विसावा घ्या;

5मी तुम्हासाठी थोडी भाकर आणतो; तुम्हाला पाहिजे तेवढे जेवा; मग पुढील प्रवास चालू करा.”ते तीन पुरुष म्हणाले, “बरं, हे तर ठीक आहे आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो.”

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

6अब्राहाम लगेच घाईने पळत तंबूत गेला व साराला म्हणाला, “तिघांना तीन भाकरी पुरतील एवढे पीठ ताबडतोब मळ, त्याच्या भाकरी कर.”

7नंतर अब्राहाम आपल्या गुरांच्या कळपाकडे पळत गेला, आणि त्यातून त्याने उत्तम कोवळे वासरु घेतले; ते दासाजवळ देऊन त्याने त्याला लवकर कापून जेवणासाठी रांधण्यास सांगितले;

8अब्राहामाने त्या तीन पुरुषांना वासराचे शिजवलेले मांस, तसेच दूध व लोणी खाण्यासाठी त्यांच्यापुढे वाढले आणि त्यांचे जेवण संपेपर्यंत अब्राहाम राईत झाडाखाली त्यांच्या जवळ त्यांची सेवा करण्याकरीता उभा राहिला.

9ते पुरुष अब्राहामाला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?”अब्राहाम म्हणाला, “ती तंबूत आहे.”

10मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋ तूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या.

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

11अब्राहाम व सारा वयाने फार म्हातारे झाले होते. साराचे मुले होण्याजोगे वय निघून गेले होते.

12म्हणून साराने जे ऐकले त्यावर विश्वास ठेवला नाहीं. ती स्वत:शीच हसून म्हणाली, “मी म्हातारी झाली आहे, आणि माझा नवराही म्हातारा झाला आहे मी इतकी म्हातारी झाली आहे की आता मला मूल होणे शक्य नाही.”

13तेव्हा परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता म्हातारी झाली आहे म्हणून मला मुलगा होईल काय असे ती का म्हणाली.

14परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”

15परंतु सारा म्हणाली, “मी हसलेच नाही!” (ती असे म्हणाली कारण ती फार घाबरली होती.)परंतु परमेश्वर म्हणाला, “नाही, मला माहीत आहे की हे खरे नाहीं; तू नक्की हसलीसच.”

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

16नंतर ते पुरुष उठले व सदोम नगराकडे वळून ते तिकडे जाण्यास निघाले; अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यासाठी त्यांच्या बरोबर थोडा रस्ता चालून गेला.

17परमेश्वर आपणा स्वत:शीच बोलला, “मी आता जे काही करणार आहे त्या विषयी अब्राहामाला सांगावे काय?

18कारण अब्राहामापासून एक मोठे व शक्तीमान राष्ट्रे नक्की निर्माण होईल, आणि पृथ्वीवरील सगळी राष्ट्रे त्याच्यामुळे आशीर्वादित होतील.

19मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.”

20मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे.

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

21म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.”

22मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला.

23मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय?

24आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील.

25तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.”

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

26नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.”

27मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे;

28समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.”

29पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.”

30मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.”

Genesis 18 illustration - Genesis Chapter 18

31मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.”

32अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”

33मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत गेला.

Chapter Complete

You have read Genesis 18

33 verses