Lumina
Exodus

Consecration of the Priests

Exodus 29·Marathi Bible

1परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोन व त्याची मुले याजक या नात्याने विशेष प्रकारे माझी सेवा करावी यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी तू काय करावेस ते मी तुला सांगतो: अहरोन व त्याची मुले यांनी माझ्या सेवेसाठी याजक या नात्याने त्यांचे समर्पण करण्यासाठी याप्रमाणे विधी करावा: एक गोज्या व दोन निर्दोष मेंढे घ्यावेत;

2मग मैद्याच्या बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर पोळया व जैतुनाचे तेल लावलेल्या बेखमीर चपात्या कराव्यात;

3त्या सर्व एका टोपलीत घालून ती टोपली त्याच प्रमाणे तो गोज्या व ते दोन मेंढे त्याचवेळी अहरोन व त्याची मुले यांच्याकडे द्यावीत;

4“अहरोन व त्याचे पुत्र यांना दर्शन मंडपाच्या दारासमोर घेऊन यावे; त्यांना आंघोळ घालावी;

5याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

6त्याच्या डोक्याला मंदिल किंवा फेटा बांधावा आणि फेट्यावर पवित्र मुकुट ठेवावा.

7नंतर अभिषेकाचे तेल घेऊन ते अहरोनाच्या डोक्यावर ओतावे व त्याला अभिषेक करावा; यावरून अहरोनाला याजकाच्या सेवेसाठी निवडले आहे असे दिसून येईल.

8“मग त्याच्या मुलांना तेथे आणून त्यांना अंगरखे घालावेत;

9मग त्यांना कमरबंद बांधावेत व त्यांच्या डोक्यांना फेटे बांधावेत; अशा प्रकारे या विधीने त्यांना याजकपद मिळेल व ते कायम राहील. ह्याप्रमाणे अहरोन व त्याची मुले यांच्यावर संस्कार करुन तू त्यांना याजक बनवावेस.

10“नंतर तो गोज्या दर्शन मंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

11मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा; परमेश्वर हे सर्व पाहील.

12मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी तू वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

13मग त्याच्या आतड्यांवरील सर्व चरवी, काळजाभोंवतीची चरवी आणि दोन्ही गुरदे व त्यांच्या भोवतीची चरबी अशी त्या गोऱ्ह्याच्या शरीरातील सर्व चरबी काढून घ्यावी व गुरदे व तिचा वेदीवर होम करावा.

14नंतर गोऱ्हाचे मांस, कातडे व बाकी राहिलेले शरीर छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावे; हा याजकांच्या पाप निवारण्याचा यज्ञ होय.

15“मग अहरोन व त्याच्या मुलांनी आपले हात एका मेढ्यांच्या डोक्यावर ठेवावेत;

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

16आणि त्या मेंढ्याचा वध करावा; त्याच्या रक्तातून थोडेस रक्त घेऊन वेदीच्या चारही बाजूस शिंपडावे.

17मेंढा कापल्यानंतर त्याचे तुकडे करावेत; मग त्याची आतडी व पाय धुऊन ते, त्याचे तुकडे व डोके ह्यांच्या बरोबर ठेवावेत;

18मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.

19“नंतर अहरोन व त्याच्या मुलांनी दुसऱ्या मेंढ्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत;

20मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळया व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या आंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूस शिंपडावे.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

21नंतर वेदीवरील थोडे रक्त घेऊन ते अभिषेकाच्या तेलात मिसळावे, व त्यातले काही घेऊन अहरोनावर व त्याच्या वस्त्रावर तसेच मुलांवर व त्यांच्या वस्त्रावरही शिंपडावे; त्यामुळे तो व त्याची वस्त्रे आणि त्याच्या बरोबर त्याची मुले व त्यांची वस्त्रे शुद्ध होतील, यावरुन अहरोन व त्याची मुले माझे याजक आहेत व ते विशेष वस्त्रे घालून माझी सेवा करतात हे दिसेल.

22“तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत;

23त्याचप्रमाणे परमेश्वरासमोर ठेवलेल्या बेखमीर भाकरीच्या टोपलीतून एक भाकर, तेलात मळलेल्या सपिठाची एक पोळी व एक चपाती घ्यावी

24आणि ते सर्व अहरोन व त्याच्या मुलांच्या हातावर ठेवावे व ते अर्पण म्हणून परमेश्वरासमोर वर धरण्यास त्यांना सांगावे.

25मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

26“मग त्या मेंढ्याचे ऊर घेऊन परमेश्वरासमोर विशेष अर्पण म्हणून वर धरावे; मग ते तुझ्याकरिता तुझ्याजवळ ठेव.

27नंतर अहरोन व त्याची मुले ह्यांच्या समर्पण विधीसाठी मारलेल्या मेढ्याचे अर्पिलेले ऊर व मांडी ही अहरोन व त्याच्या मुलांना द्यावी; हे अर्पण त्यांच्यासाठी पवित्र होईल.

28इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.

29“अहरोनाची पवित्र वस्त्रे त्याच्यानंतर सांभाळून ठेवावीत; ती त्याच्या पुत्रपौत्रांसाठी असावीत, जेव्हा त्यांची याजक म्हणून निवड होईल तेव्हा त्यांनी ती घालावीत.

30अहरोनाच्या जागी त्याचा जो मुलगा याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्त्रे सात दिवस घालावीत.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

31महान याजक म्हणून अहरोनाच्या समर्पण विधीसाठी वध केलेल्या मेंढ्याचे मांस घेऊन ते पवित्र जागी शिजवावे;

32अहरोन व त्याच्या मुलांनी त्या मेंढ्याचे मांस आणि टोपलीतील भाकर दर्शनमंडपाच्या दारापाशी खावी;

33ही अर्पणे त्यांची पवित्र याजकासाठी निवड होण्याच्या वेळी, त्यांचे पाप नाहीसे व्हावे म्हणून वाहिलेली होती, म्हणून ती अर्पणे त्यांनीच खावीत.

34समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.

35“अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पण विधीच्या सात दिवसात मी तुला आज्ञा केलेल्या ह्या सर्व गोष्टी कराव्यात.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

36त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे

37सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.

38“दररोज वेदीवर एक एक वर्षाची दोन कोकरे ठार मारावीत व त्यांचा होम करावा.

39एका कोकराचा सकाळी व दुसऱ्या कोकराचा संध्याकाळी होम करावा.

40पहिल्या कोकराच्या अर्पणासोबत आठमापे सपीठपाव हीन -(द्रव पदार्थ मोजण्याचे माप)-द्राक्षारसात मळून अर्पण करावे.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

41आणि संध्याकाळी दुसऱ्या कोकराबरोबरही सकाळच्या अर्पणाप्रमाणे आठमापे सपीठ अर्पण करावे व पाव हीन द्राक्षारसाचे पेयार्पण करावे; ह्या हव्याच्या मधुर सुवासाने परमेश्वराला संतोष होईल.

42“ह्या सर्व गोष्टीचे अर्पण दर्शनमंडपाच्या दारापाशी दररोज परमेश्वरासमोर करीत राहावे; ह्या अर्पणानंतर मी परमेश्वर त्या ठिकाणी भेट देईन व तुमच्याशी बोलेन.

43त्याठिकाणी मी इस्राएल लोकांना भेटेन आणि माझ्या महानतेने मंडप पवित्र होईल.

44“ह्याप्रमाणे मी दर्शनमंडप व वेदी पवित्र करीन आणि अहरोन व त्याच्या मुलांना याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून मी त्यांनाही पवित्र करीन.

45मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.

Exodus 29 illustration - Exodus Chapter 29

46आणि लोकांना समजेल की मी त्यांचा देव परमेश्वर आहे; मला त्यांच्याबरोबर राहाता यावे म्हणून मीच त्यांना मिसर देशातून सोडवून आणले आहे हे त्यांना कळेल; मीच परमेश्वर त्यांचा देव आहे.”

Chapter Complete

You have read Exodus 29

46 verses