Lumina
2Samuel

God's Covenant with David

2Samuel 7·Marathi Bible

1राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला.

2एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”

3नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”

4पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,

5“दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग. “परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस.

2Samuel 7 illustration - 2Samuel Chapter 7

6इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर काढले मी त्यावेळी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर.

7इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’

8“शिवाय दावीदाला हे ही सांग “सर्वशकितमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले.

9तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.

10माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली. त्यांना रुजवले. त्यांना जागोजाग भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.

2Samuel 7 illustration - 2Samuel Chapter 7

11

12“तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन.

13तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन.

14मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक

15पण माझे त्याच्यावरचे प्रेम खंडित होणार नाही. त्याच्यावर माझी कृपादृष्टी राहील. शौलावरील माझा लोभ आणि प्रेम संपुष्टात आले. मी तुझ्याकडे वळलो तेव्हा तुझ्यासमोर मी त्याला दूर ढकलले. पण तुझ्या घराण्याच्या बाबतीत मी असे करणार नाही.

2Samuel 7 illustration - 2Samuel Chapter 7

16राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.”

17नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.

18यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभो, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस?

19मी केवळ तुझा सेवक आहे. (तुझ्या माझ्यावर किती लोभ आहे!) पुढे माझ्या वंशजांबद्दलही तू असाच लोभ दाखवला आहेस. सर्वांशी तुझा व्यवहार नेहमी असाच असतो का?

20मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.

2Samuel 7 illustration - 2Samuel Chapter 7

21तू करणार म्हणालास आणि तुला तसे करायची इच्छा आहे. तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस.

22माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो.

23“पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. (ती गुलाम होती) तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुकत केलेस. तिला आपली प्रजा मानलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भुत चमत्कार केलेस.

24तू निरंतर त्यांना स्वत:च्या कवेत घेतलेस. तू त्यांचा देव झालास.

25“आता तर, परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करुन तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करु दे.

2Samuel 7 illustration - 2Samuel Chapter 7

26मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, “सर्वशकितमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे.’

27“सर्वशकितमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, “मी तुझ्यासाठी घर बांधीन’ म्हणून मी, तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे.

28प्रभो, परमेश्वरा तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास.

29आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

Chapter Complete

You have read 2Samuel 7

29 verses