Lumina
2Kings

Manasseh and Amon

2Kings 21·Marathi Bible

1मनश्शे राज्य करु लागला तेव्हा तो बारा वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर पंचावन्र वर्षे, राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबा.

2परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले तेच त्याने केले. इतर राष्ट्रे करत तसे अमंगळ आचरण मनश्शेने केले (आणि इस्राएली आले त्यावेळी याच राष्ट्रांना परमेश्वराने तेथून हुसकून लावले होते.)

3हिज्कीयाने नष्ट केलेली उंचस्थानावरील पुजास्थळे मनश्शेने पुन्हा बांधली तसेच त्याने बालदेवतेसाठी वेदी बांधली आणि इस्राएलचा राजा अहाब याच्याप्रमाणे अशेरा देवीचे स्तंभ उभारले. मनश्शे नक्षत्रांची पूजाही करत असे.

4परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्याग बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.)

5या खेरीज या मंदिराच्या दोन्ही चौकांत मनश्शेने आकाशातील नक्षत्रांसाठी वेद्या बांधल्या.

2Kings 21 illustration - 2Kings Chapter 21

6आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले.जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता.परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.

7मनश्शेने अशेराचा कोरीव पुतळा करुन तो मंदिरात ठेवला. या मंदिराविषयी दावीद आणि दावीदचा मुलगा शलमोन यांना परमेश्वर म्हणाला होता, “इस्राएलमधील सर्व नगरांमधून मी यरुशलेमची निवड केली आहे. यरुशलेममधील मंदिरात मी माझे नाव कायमचे ठेवीन.

8इस्राएल लोकांना या भूमीतून बाहेर पडावे लागू नये याची मी दक्षता घेईल. माझ्या सर्व आज्ञा तसेच मोशेची शिकवण त्यांनी तंतोतंत पाळली तर त्यांची इथेच या भूमीत वसती राहील.”

9पण लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. इस्राएल लोक इथे येण्यापूर्वी कनानमधील राष्ट्रांनी जी वाईट वर्तणूक केली त्यापेक्षाही मनश्शेचे वर्तन निंद्य होते. इस्राएल लोक या भूमीत आले तेव्हा त्या राष्ट्रांना परमेश्वराने नष्ट केले होते.

10तेव्हा परमेश्वराने आपल्या सेवक संदेष्ट्यांना हे सांगायला सांगितले,

2Kings 21 illustration - 2Kings Chapter 21

11“यहूद्यांचा राजा मनश्शे याने अत्यंत निंद्य कृत्ये केली आहेत. त्याच्या आधीच्या अमोऱ्यांपेक्षाही याचे वागणे भयंकर आहे. त्याच्या त्या मूर्तीमुळे त्याने यहूदालाही पाप करायला लावले आहे.

12तेव्हा इस्राएलचा परमेश्वर म्हणतो, ‘यरुशलेम आणि यहूदा यांना मी आता अशा संकटाच्या खाईत लोटीन की ते ऐकूनच लोकांना धक्का बसेल.

13शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.

14त्यातूनही काहीजण बचावतील. पण त्यांना मी तसेच सोडीन. त्यांना मी त्यांच्या शत्रूच्या ताब्यात देईन. ते त्यांना युध्दातील लुटीप्रमाणे कैदी करुन नेतील.

15मी जे जे करु नका म्हणून बजावले ते ते त्यांनी केले त्याचे हे फळ होय. यांचे पूर्वज मिसरमधून बाहेर पडले त्या दिवसापासूनच यांनी मला संताप आणला आहे.

2Kings 21 illustration - 2Kings Chapter 21

16शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘

17मनश्शेची पापे आणि इतर कृत्ये ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकांत लिहिलेली आहेत.

18मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्याला पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.

19आमोन राज्य करु लागला तेव्हा बावीस वर्षांचा होता. त्याने यरुशलेमवर दोन वर्षे राज्य केले. याच्या आईचे नाव मशुल्लेमेथ ही यटबा येथील हारुस याची मुलगी.

20आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.

2Kings 21 illustration - 2Kings Chapter 21

21तो आपल्या वडीलांसारखाच होता. वडीलांनी ज्या देवतांची पूजाअर्चा केली त्यांचीच पूजा आमोननेही आरंभली.

22आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.

23आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुध्द कट करुन त्याच्या घरातच त्याला ठार केले.

24आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.

25आमोनने जी इतर कृत्ये केली ती सर्व “यहूदाच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात लिहून ठेवलेली आहेत.

2Kings 21 illustration - 2Kings Chapter 21

26उज्जाच्या बागेत आमोनचे दफन करण्यात आले. आमोनचा मुलगा योशीया राजा झाला.

Chapter Complete

You have read 2Kings 21

26 verses