Lumina
1Samuel

Jonathan's Daring Attack

1Samuel 14·Marathi Bible

1त्यादिवशी शौलचा मुलगा योनाथान आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकाला म्हणाला, “चल, आपण खिंडीपलीकडील पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ. आपल्या वडीलांना मात्र त्याने हे सांगितले नाही.”

2शौल तेव्हा गिबाच्या सीमेपाशी मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली बसला होता. जवळच धान्याचे खळे होते. शौल सोबत सहाशे माणसे होती.

3त्यातील एकाचे नाव अहीया. शिलो येथे एली म्हणून परमेश्वराचा याजक होता. त्याच्या जागी आता हा होता. अहीयाने एफोद घातला होता. ईखाबोदचा भाऊ अहीदूब याचा हा मुलगा. ईखाबोद फिनहासचा आणि फिनहास एलीचा मुलगा. योनाथान निघून गेला हे लोकांना माहीत नव्हते.

4खिंडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठे सुळके होते. योनाथानने त्यांच्या मधूनपलिष्ट्यांच्या ठाण्यावर जायचे ठरवले. एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसऱ्याचे सेने असे होते.

5एक सुळका उत्तरेला मिखमाशच्या दिशेने तर दुसरा दक्षिणेला गिबाकडे वळलेला होता.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

6योनाथान आपल्या शस्त्रवाहक सेवकाला म्हणाला, “चल त्या परकीयांच्या ठाण्यावर जाऊ. कदाचित परमेश्वर आपल्या हातून त्यांचा पराभव करील. सैन्य कमी की जास्त याचा परमेश्वराला काय फरक पडतो?”

7तेव्हा तो सेवक म्हणाला, “तुम्ही म्हणाल तसे करु. मी आपल्याबरोबरच आहे.”

8योनाथान म्हणाला, “चल तर! ही खिंड ओलांडून त्यांच्या पहारेकऱ्यांपर्यंत जाऊ. त्यांना आपल्याला पाहू दे.

9‘आहात तिथेच थांबा, आम्ही तेथे येतो’ असे ते म्हणाले तर आपण तिथेच थांबू. आपण पुढे जायचे नाही.

10पण त्यांनी पुढे यायला सांगितले तर मात्र पुढे व्हायचे. तसे झाले तर ती देवाची खूण समजायची. याचा अर्थ असा की त्यांचा पराभव करण्याची परमेश्वराने आपणास मुभा दिली आहे.”

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

11हे दोघे, पलिष्टी सैनिकांच्या नजरेच्या टप्प्यात आले. ते सैनिक म्हणाले, “पाहा, ते बिळात लपून राहिलेले इब्री आता बाहेर पडत आहेत.”

12त्या छावणीतील पलिष्ट्यांनी या दोघांना “वर या म्हणजे चांगला धडा शिकवतो” असे धमकावले. योनाथान आपल्या सेवकाला म्हणाला, “चल माझ्या मागोमाग. परमेश्वर आता आपल्या हातून पलिष्ट्यांना नेस्तनाबूत करील.”

13योनाथान मग हाता पायांनी आधार घेत घेत तो कडा चढून गेला. त्याचा सेवक त्याच्या पाठोपाठ होताच. दोघांनी मिळून पलिष्ट्यांवर हल्ला चढवला. त्यांनी त्या एक बिघा जमिनीवर पहिल्या चढाईत वीसजणांना ठार केले. समोरुन येणाऱ्यांवर योनाथानने हल्ला केला आणि त्यात जखमी झालेल्यांना योनाथानच्या सेवकाने मागोमाग येऊन ठार केले.

14

15तेव्हा छावणीत, शेतात, किल्ल्यावर पसरलेल्या सर्व पलिष्ट्यांमध्ये घबराट पसरली. चांगल्या शूर सैनिकांनीही धास्ती घेतली. त्यांच्या पायाखालची भूमी कंपायमान झाली आणि पलिष्टी भयभीत झाले.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

16इकडे बन्यामीनच्या भूमीतील गिबा येथे असलेल्या शौलच्या रक्षकांनी पलिष्ट्यांना सैरावैरा पळताना पाहिले.

17शौल आपल्या रक्षकांना म्हणाला, “आपली माणसे मोजा. कोण छावणी सोडून गेले ते पाहू.”मोजणीतून योनाथान आणि त्याचा सेवक गेल्याचे लक्षात आले.

18शौल अहीयाला म्हणाला, “परमेश्वराचा पवित्रकरारकोश आण” (त्यावेळी देवाचा हा पवित्र करारकोश इस्राएलांजवळ होता.)

19अहीयाशी बोलत आसताना शौल परमेश्वर काही सल्ला देईल म्हणून वाट पाहात होता. इकडे पलिष्ट्यांच्या ठाण्यावरील गलबला व गोंधळ वाढत चालला. शौलचा धीर सुटत चालला. शेवटी तो याजक अहीया याला म्हणाला, “आता प्रार्थना पुरे. तु थांब.”

20शौलने सैन्य जमा केले आणि तो युद्धाला भिडला. पलिष्ट्यांची आता दाणादाण उडाली. इतकी की ते आपापसातच लढू लागले.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

21पूर्वी पलिष्ट्यांचे सेवक असलेले काही इब्री सध्या पलिष्ट्यांच्या छावणीत होते. ते आता शौल आणि योनाथान यांना जाऊन मिळाले.

22एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात दडून राहिलेल्या इस्राएलांनी पलिष्ट्यांच्या पलायनाची बातमी ऐकली. तेव्हा तेही युद्धात उतरले आणि त्यांनी पलिष्ट्यांचा पाठलाग सुरु केला.

23अशाप्रकारे परमेश्वराने त्यादिवशी इस्राएलांचा बचाव केला. युद्ध बेथ-आवेन कडे सरकले. जवळ जवळ दहा हजाराचे सर्व सैन्य शौलच्या पाठीशी होते. एफ्राईमच्या डोंगराळ परदेशातील सर्व नगरांमध्ये युद्ध पसरले.

24पण शौलच्या हातून त्या दिवशी मोठी चूक झाली. सर्व इस्राएल लोक दमले भागलेले आणि भुकेले होते. शौलने त्यांच्याकडून सक्तीने एक शपथ घेतली होती. “संध्याकाळ व्हायच्या आत आणि शत्रूचा पाडाव करण्यापूर्वी कोणी काही खाल्ले तर त्याला शासन होईल.” अशा त्या शपथेमुळे कोणीही अन्नग्रहण केले नव्हते.

25लढत लढत लोक रानात शिरले. तिथे त्यांना जमिनीवर मधाचे पोळे दिसले पण ते पाहूनही लोकांनी त्यातील मधाला हात लावला नाही कारण शपथेचा धाक त्यांच्या मनात होता.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

26

27आपल्या वडीलांनी सर्वाना बळजबरीने अशी शपथ घ्यायाला लावली आहे याबद्दल योनाथानला काहीच माहीत नव्हते. तेव्हा त्याने आपल्या हातातील काठी पोळ्यात खुपसली आणि मध काढला. थोडा मध खाल्यावर त्याला चांगली तरतरी आली.

28एक सैनिक योनाथानला म्हणाला, “तुमच्या वडीलांनी लोकांना शपथ घालून बजावले आहे की आज कोणी काही खाल्ले तर त्याला शाप लागेल. म्हणून लोकांनी काही खाल्लेले नाही. ते भुकेने व्याकुळ झाले आहेत.”

29योनाथान म्हणाला, “माझ्या वडीलांनी देशावर खूप संकटे आणली आहेत. थोडासा मध खाताच मला पाहा कसे ताजेतवाने वाटू लागले!

30लोकांनीही शत्रूच्या लूटीतून थोडे खाल्ले असते तर बरे झाले असते. आपण यापेक्षा जास्त पलिष्ट्यांना गारद करु शकलो असतो.”

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

31मिखामाशापासून अयालोन पर्यंत पलिष्ट्यांचा पाडाव करता करता इस्राएल लोक फार थकून गेले होते. ते भुकेलेही होते.

32त्यांनी पलिष्ट्यांची मेंढरे गुरे, वासरे लुटून आणली होती. आता ते भुकेने इतके कासावीस झाले होते की त्यांनी ती गुरे तिथेच जमिनीवर मारुन खाल्ली. त्यांचे रक्तसुद्धा चाटले.

33तेव्हा एक जण शौलला म्हणाला, “पाहा, हा परमेश्वराच्या दृष्टीने अपराध आहे. ही माणसे तर रक्तासकट मांस खात आहे.”शौल म्हणाला, “तुम्ही पाप केले आहे. आता एक मोठा दगड लोटून येथे आणा.”

34पुढे तो म्हणाला, “जा, त्या लोकांना जाऊन सांगा की प्रत्येकाने बैल मेंढरे माझ्यासमोर आणावी आणि मगच त्यांनी ती इथे कापावी. असे पाप करु नका. रक्ताने भरलेले मांस खाऊ नका.”मग सर्वानी आपापली जनावरे तेथे आणली आणि मारली.

35तेव्हा शौलने स्वत:हून परमेश्वरासाठी वेदी बांधली.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

36तो म्हणाला, “आज रात्री आपण पलिष्ट्यांवर हल्ला करु. त्यांचे सर्व हिरावून घेऊन त्या सर्वाना कापून काढू.”सर्व सैन्याने त्याच्या म्हणण्याला साथ दिली.पण याजक म्हणाला, “आपण परमेश्वराचा कौल मागू.”

37म्हणून शौलने परमेश्वराला विचारले, “आम्ही आज पलिष्ट्यांवर चालून जाऊ का? तू आम्हाला त्यांचा पराभव करु देशील का?” पण त्यादिवशी परमेश्वराने शौलला उत्तर दिले नाही.

38तेव्हा शौल म्हणाला, सर्व अधिकाऱ्यांना, लोकनायकांना माझ्यासमोर बोलवा. आज कोणाच्या हातून पाप घडले आहे ते पाहू.

39इस्राएलला तारणाऱ्या परमेश्वराची शपथ घेऊन मी सांगतो की अगदी माझा पोटचा मुलगा योनाथान याच्याहातून अपराध घडला असेल तरी त्याला देहान्त शासन होईल.” यावर कोणीही चकार शब्द ही काढला नाही.

40मग शौल सर्व इस्राएलांना म्हणाला, “तुम्ही सर्व एका बाजूला उभे राहा. मी आणि माझा मुलगा योनाथान दुसऱ्या बाजूला होतो.”सर्वानी ते मानले.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

41मग शौलाने प्रार्थना केली, “इस्राएलच्या परमेश्वरा, देवा, आज तू माझी प्रार्थना का ऐकली नाहीस? मी किंवा माझा मुलगा योनाथान याच्या हातून पाप घडले असेल तर उरीम टाक आणि लोकांच्या हातून पाप घडले असेल तर थुम्मीम टाक”शौल आणि योनाथानच्या नावाने दान पडले आणि लोक सुटले.

42शौल म्हणाला, “पुन्हा त्या टाका व दाखवा की मी व माझा मुलगा योनाथान पैकी कोण दोषी आहे.” मग योनाथान पकडला गेला.

43शौल त्याला म्हणाला, “तू काय केलेस ते सांग.”योनाथान म्हणाला, “कोठीच्या टोकावर मावेल एवढाच मध तेवढा मी चाखला त्यासाठी मी प्राणार्पण करायला हवे का?”

44शौल म्हणाला, “माझा शब्द पाळला गेला नाही तर शासन करायला मी परमेश्वराला सांगितले आहे. तेव्हा तुला मेलेच पाहिजे.”

45पण सर्व सैनिक शौलला म्हणाल, “योनाथानने आज इस्राएलकडे विजय खेचून आणला आहे. तेव्हा त्याने मेलेच पाहिजे का? खचितच नाही. आम्ही परमेश्वरापुढे शपथ घेऊन सांगतो की त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. पलिष्ट्यांविरुद्ध लढायला परमेश्वराने योनाथानला मदत केली आहे.” अशाप्रकारे लोकांनी योनाथानला वाचवले. त्याला मृत्यूची सजा झाली नाही.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

46शौलने पलिष्ट्यांचा पाठलाग केला नाही. पलिष्टी आपल्या जागी परतले.

47शौलने सर्व अधिकार आपल्या हाती घेऊन राज्य स्थापित केले. मवाबी, अम्मोनी, अदोमी, सोबाचे राज, पलिष्टी इत्यादी इस्राएलच्या भोवतालच्या सर्व शत्रूशी युद्ध केले. शौल जेथे जेथे गेला तेथे तेथे त्यांने शत्रूंचा पाडाव केला.

48पराक्रम गाजवला. इस्राएलांची लूट करणाऱ्या सर्व शत्रूंपासून इस्राएलांची सुटका केली. अमालेकांचाही त्याने पराभव केला.

49योनाथान, इश्वी, आणि मलकीशुवा हे शौलचे मुलगे. शौलच्या मोठ्या मुलीचे नाव मेरब आणि धाकटीचे मीखल.

50अहीनाम ही त्याची पत्नी. ती अहीमासची मुलगी.शौलचा काका नेर याचा मुलगा अबनेर त्याचा सेनापती होता.

1Samuel 14 illustration - 1Samuel Chapter 14

51शौलचे वडील कीश आणि काका नेर. ही अबियेलची मुले.

52शौलने आयुष्यभर पराक्रम गाजवले. पलिष्ट्यांचा त्याने कडवा प्रतिकार केला. त्याला कुठेही शूर, पराक्रमी माणूस आढळला की त्याला तो सैनिकात भरती करुन घेई आणि अंगरक्षक म्हणून नेमी.

Chapter Complete

You have read 1Samuel 14

52 verses